पुणे, दि. १४ जुलै : महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्त स्वाती तेली-उगले यांची भेट घेऊन भंडारा-भामचंद्र पर्वत परिसरातील कथित अवैध उत्खनन, बांधकामे आणि पर्यावरणीय हानीबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळात समितीचे प्रमुख मधुसूदन पाटील महाराज, कार्याध्यक्षा माधवी माने, संतसेवक सागर कदम, ह.भ.प. यशवंत महाराज फाले, ह.भ.प. तात्यासाहेब कोंढाळकर, ह.भ.प. शिवाजी महाराज भोईने, ह.भ.प. मधुकर महाराज ठाकरे गुरुजी, ह.भ.प. अण्णा महाराज चव्हाण, ह.भ.प. किसन महाराज टेमघरे आणि ह.भ.प. हनुमंत महाराज सुर्वे यांच्यासह अखिल वारकरी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात समितीने भामचंद्र, भंडारा आणि घोराडा हे संत तुकाराम महाराजांच्या साधना व तपोभूमीशी संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्वत असल्याचा उल्लेख करत या परिसरात गेल्या काही वर्षांपासून कथितपणे सुरू असलेल्या उत्खनन, अनधिकृत बांधकामे आणि पर्यावरणीय हानीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले.
समितीच्या म्हणण्यानुसार, २००७ पासून भामचंद्र पर्वतावर कथित बेकायदेशीर खाणकाम, संरक्षित क्षेत्रात उत्खनन, नगर नियोजनातील त्रुटी, एमआयडीसीच्या कामांमुळे झालेले डोंगर सपाटीकरण, पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमधून या परिसराला वगळल्यामुळे संतभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
निवेदनात भामचंद्र व भंडारा पर्वतांना राज्य संरक्षित स्मारक, वनक्षेत्र आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून प्रभावी संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संरक्षित क्षेत्रातील कथित अनधिकृत बांधकामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, प्रलंबित शासकीय अहवालांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि संबंधित सर्व विभागांना समन्वयाने आवश्यक आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्तांनी निवेदन स्वीकारून संबंधित बाबींची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले.
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने या संपूर्ण प्रकरणात राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीचे संरक्षण करावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
















