ईस्टर्न व्हिडिओ सोसायटीत सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन आमदार माऊली कटके यांच्या हस्ते संपन्न

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीतील ईस्टर्न मिडोज हौसिंग सोसायटीमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या वेळी बोलताना आमदार कटके यांनी नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि “मी दिवस-रात्र तुमचा सेवक म्हणून काम करत राहणार आहे,” अशी ग्वाही दिली.


उद्घाटनप्रसंगी आमदार कटके म्हणाले की, “मला जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हे माझे कर्तव्य आहे. वाघोली परिसरातील रस्ते, पाणी, लाईट, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांकडे मी बारकाईने लक्ष देतो आहे. परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करत आहे.”


यावेळी बोलताना त्यांनी वाघोलीसाठी मंजूर करण्यात आलेल्या भामाआसखेड पाणीपुरवठा ,मेट्रो लाईन विस्तार, रिंग रोड तसेच उड्डाणपूल मंजुरी याचा विशेष उल्लेख केला आणि या  प्रकल्पांमुळे वाघोलीच्या वाहतुकीच्या अडचणी कमी होतील, असा विश्वासही व्यक्त केला.


या कार्यक्रमासाठी अनिल सातव, समिर भाडळे विवेक बिडकर व सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासह सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल.सोसायटीच्या वतीने आमदार कटके यांचे विशेष सत्कार करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साही  वातावरणात पार पडला.

See also  हिवरे कुंभार शाळेची शिष्यवृत्ती परंपरा अखंडित