राजाराम पूल–म्हात्रे पूल मार्गावरील वाहतूक कोंडीवर लवकरच विस्तृत बैठक; ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूल या महत्त्वाच्या डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी, रस्त्याच्या त्रुटी आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या आठवड्यात पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा अधिकारी, नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत राजाराम पूल ते म्हात्रे पूल या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत आढळलेल्या विविध त्रुटींचा सविस्तर अहवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सादर केला. यावेळी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधताना पाटील यांनी या प्रश्नांवर वैयक्तिक लक्ष घालून तातडीने बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
पाहणीदरम्यान राजाराम पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक पोलीस उपस्थित असूनही कोंडी सिंहगड रस्त्यापर्यंत पसरत असल्याची नोंद करण्यात आली. तसेच सन सिटी येथून ‘चा पूल’ मार्ग सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, डिव्हायडरमध्ये अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी अनियोजित मार्ग तयार करण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामुळे पादचारी क्रॉसिंगची व्यवस्था, पाणी साचणाऱ्या ठिकाणी जलनिस्सारण सुधारणा, अरुंद झालेल्या रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे, सलग रोड डिव्हायडर उभारणे, मातोश्री वृद्धाश्रम चौकात वाहतूक सिग्नल बसविणे तसेच पंडित फार्मसमोरील डिव्हायडरची समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

या पाहणीवेळी पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, उपअभियंता सचिन मेहेंदळे, विनायक शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी, “चंद्रकांतदादा पाटील यांनी या विषयात स्वतः लक्ष घातल्यामुळे राजाराम पूल–म्हात्रे पूल मार्गावरील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या समस्या लवकर मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांना आहे,” असे सांगितले.

See also  पिंपळे निलख मुळा नदी दुषित पाण्यामुळे फेसाळली