पुढील पिढीसाठी आजपासूनच पाणी वाचवा; जलसंधारण ही काळाची गरज – सतीश खाडे

पुणे : “पुढच्या पिढीचा विचार करा आणि आजच पाणी वाचवायला सुरुवात करा. जल पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रभावीपणे राबविले नाही, तर भविष्यात गंभीर जलसंकटाला सामोरे जावे लागेल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध जलसंधारण तज्ज्ञ सतीश खाडे यांनी केले.

बालेवाडी वेलफेअर फेडरेशनच्या वतीने ‘जल पुनर्भरण आणि जलसंधारण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुणेकरांच्या पाण्याच्या गरजेपैकी सुमारे ६५ टक्के गरज धरणातील पाणी, तर ३५ टक्के गरज भूजल साठ्यातून भागविली जाते, असे सांगितले. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे भूजल साठा वेगाने कमी होत असून, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये केवळ कायदेशीर पूर्तता म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारले जातात; मात्र त्यांची नियमित देखभाल व कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी हवामान बदल, जलसंकट आणि जलप्रदूषण या विषयांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी खाडे यांनी पाणी बचतीसाठी घरगुती स्तरावर करता येणाऱ्या उपायांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. नळांना एरेटर आणि फ्लो रेग्युलेटर बसविल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. श्रीकांत साबू, स्नेहल गुप्ता आणि प्रल्हाद पांडे यांनी विविध उपायांविषयी माहिती घेतली.

बालेवाडी वेलफेअर फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी जलसंधारणाबाबत जनजागृतीचे अभियान सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसंवादानंतर आदित्य ब्रिज सोसायटीतील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कंत्राटदार रमेश गायके यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

गेली १३ वर्षे जलसाक्षरता आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सतीश खाडे यांनी ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखन केले असून त्यांच्या कार्याचा विविध संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे.

कार्यक्रमात बालेवाडी वेलफेअर फेडरेशनच्या वतीने दफेदार सिंह, आशिष कोटमकर, शकील सलाती, वंदना चौधरी आणि शैलेश पाटील यांच्या हस्ते सतीश खाडे यांचा सत्कार करण्यात आला. आदित्य ब्रिज सोसायटीचे सचिव मंगलमूर्ती यांनी स्वागत केले, तर योगेश डुंबरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, शुभांगी इंगवले, योगेंद्र सिंह आणि यश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

See also  केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे - डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार