पुणे : जागतिक नेत्रदान दिनानिमित्त भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, धनकवडी आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या नेत्रचिकित्सा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
हे शिबिर भारती विद्यापीठाच्या नेत्रचिकित्सा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित पाटील, डॉ. शिवानंद हदीमणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच मोफत नेत्र तपासणीद्वारे आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे होते.
शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले. सहभागींची नेत्र तपासणी करून आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नेत्रांची स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाय आणि दैनंदिन जीवनात नेत्र आरोग्य जपण्याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.
या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे २०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख, उपप्राचार्य श्री. अमित पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. विद्या खोबरे आणि प्रा. जागृती कडू यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.















