म्हाळुंगे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने म्हाळुंगे टाउनशिपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पायी दिंडी सोहळा २०२६’* ला रहिवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. हजारो भाविक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण टाउनशिपला भक्तिरसात न्हाऊ घातले.
VTP Aethereus येथून प्रारंभ झालेल्या दिंडीने Green Vista, Godrej Hillside 1, Alpine, Kul Ecoloch, BelAir आणि Leonara मार्गे गणपती मंदिर गाठले. मार्गभर “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “पांडुरंग हरी विठ्ठल” यांच्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद, पारंपरिक वेशभूषेतील वारकरी आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण म्हाळुंगे टाउनशिप जणू पंढरीचे रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रत्येक सोसायटीतील रहिवाशांनी दिंडीचे उत्साहात स्वागत करत या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा भक्तिमय वारसा यांचे सुंदर दर्शन या सोहळ्यात घडले.
दिंडीचा समारोप गणपती मंदिर येथे आरती व महाप्रसादाने झाला. या सोहळ्याने म्हाळुंगे टाउनशिपमधील सामूहिक सहभाग, एकोप्याची भावना आणि अध्यात्मिक संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडविले.
















