बालेवाडी : बाणेर येथील आनंदवन हास्ययोग परिवार, मुरकुटे गार्डन यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधत ‘आषाढी वारी पालखी सोहळा’ मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. त्यानंतर पालखी पूजन व आरती करून पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास नगरपंचायत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथील सहाय्यक आयुक्त प्रताप भोसले व त्यांच्या पत्नी स्नेहल भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बालेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल बालवडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
पालखीचे प्रस्थान वीरभद्रनगर लेन क्रमांक ८, बाणेर येथून होऊन मुरकुटे गार्डनपर्यंत भक्तिमय मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. मुरकुटे गार्डन येथे पालखीचे पूजन, आरती व दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर मान्यवरांचा सत्कार आनंदवन हास्य परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली.
या पालखी सोहळ्याचे आयोजन समस्त आनंदवन हास्य परिवाराच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजय कदम, राजू मालू, प्रताप कवाडकर, सुखदेव पवार आणि डॉ. जनार्दन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
याचबरोबर आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुप्रीम एस्टिया सोसायटीमध्ये ‘भजन अमृत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोसायटीचे सदस्य चंद्रशेखर घाटे यांनी आपल्या सुमधुर आवाजात विठ्ठलभक्तीपर भजने सादर केली. त्यांच्या सुरेल भजनांनी उपस्थित श्रोते अक्षरशः भक्तिरसात तल्लीन झाले. या कार्यक्रमाला सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावून विठ्ठलनामाचा आनंद लुटला.
















