महाळुंगे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाळुंगे गाव परिसरात प्रमोद अण्णा निम्हण व सौ. पूनम विशाल विधाते यांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. कपबशी व शिट्टी या निवडणूक चिन्हांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या दौऱ्याला महाळुंगे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
महाळुंगे गावातील अंतर्गत रस्ते, वाड्या-वस्त्यांमधून फिरताना नागरिक स्वतःहून पुढे येत उमेदवारांशी संवाद साधत होते. महिलांपासून युवकांपर्यंत, तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही प्रचार दौऱ्यात सक्रिय सहभाग घेतला. ठिकठिकाणी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
या प्रचार दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच महिला व युवकांचे प्रश्न नागरिकांनी ठळकपणे मांडले. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत महाळुंगे गावाच्या नियोजित व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना सौ. पूनम विशाल विधाते म्हणाल्या,“महाळुंगे गावातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास हीच आमची ऊर्जा आहे. महिलांच्या प्रश्नांपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ठोस काम केले जाईल.”
प्रमोद अण्णा निम्हण यांनी सांगितले,“गावाचा विकास हा कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे. पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या सहभागातूनच महाळुंगेचा बदल घडवू.”
या प्रचार दौऱ्यामुळे महाळुंगे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कपबशी व शिट्टीच्या चिन्हाला वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. नागरिकांचा सहभाग आणि विश्वास पाहता आगामी निवडणुकीत परिवर्तनाची लाट अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
























