आळंदी वारकऱ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार ; घटनेचा विविध स्तरातून निषेध

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सायंकाळी पाचच्या सुमारास प्रस्थान झाले. या सोहळ्यासाठी मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा वारकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे.

पंढरीला जाणारे संतांचे पालखी सोहळे स्वयंशिस्त पाळतात. प्रस्थान ते पंढरपूर यादरम्यान वारकरी पूर्णपणे शिस्तीत वाटचाल करतात. अगदी पोलिसांनाही गर्दी नियंत्रणाचा वगैरे ताण येत नाही. मात्र यंदा माऊलींच्या मंदिराच्या महाद्वारावरच मंदिरात प्रवेश करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

कारण गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून या वर्षी ४७ दिंड्यांमधील केवळ ७५ वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात होता. त्याच वेळी अनेक वारकरी आम्हाला मंदिरात प्रवेश द्यावा, म्हणून पोलिसांकडे आग्रह धरत होते. शेवटी महाद्वाराजवळ वारकऱ्यांची संख्या वाढल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वारकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.

सरकारचा निषेध : अजित पवार
दुसरीकडे समाजमाध्यमांवर लाठीमाराचे वृत्त पसरताच विरोधी पक्षांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आळंदीहून प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

See also  राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान