गुरु पौर्णिमेनिमित्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचा गौरव; मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळेत उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी

पुणे, धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी, पुणे येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या धनराज गोविंद आंदे या गुणवंत विद्यार्थ्याचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक पाटील, उपाध्यक्ष श्री. अनुराग पाटील, संस्थापिका व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विजय श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकातून गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान स्पष्ट करत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या धनराज गोविंद आंदे याचे विशेष कौतुक केले व इतर विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु महिमा, संस्कार, शिक्षणाचे महत्त्व यांवर आधारित भाषणे, कविता, भक्तिगीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पूजन करून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

साक्षी मस्के (5 वी), श्रुती भोसले (6 वी), श्रावणी कंगणकोटे (7 वी), धनश्री पवार (8 वी), समीक्षा चवळे (9 वी) व जानवी ढवळे (10 वी) यावेळी या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मानसी पलांडे, तृप्ती कांबळे, योगेश बिंदगे, उर्मिला माळी, अर्चना बनछोड, सविता इमडे, सुखदा वाळंज, शारदा पाटोळे, मारुती पाटील, मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, अनामिका कुलकर्णी, शुभांगी काळगुडे, रूपाली पवार, प्रिया शेलार, ममता चौधरी, रमाताई डंबारे, गौतम बोरकडे, मुकेश विधाते, मोनालिसा भालेराव आणि सुरज ब्रह्मराक्षे यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता इमडे यांनी केले.

See also  राज्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात – सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरु पौर्णिमेच्या या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, शिक्षणाविषयी निष्ठा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची प्रेरणा निर्माण झाली. शिष्यवृत्ती परीक्षेतील धनराज गोविंद आंदे यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.