अमोल बालवडकर यांच्या टीकेला भाजपाचे मौन; चंद्रकांत पाटील शहर भाजपात एकटे पडले का?

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे या टीकेला भाजपाच्या शहरातील नेत्यांकडून अपेक्षित असे प्रत्युत्तर मिळताना दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमोल बालवडकर विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. मात्र, भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून किंवा कोथरूड मतदारसंघातील नेत्यांकडून त्याला ठोस आणि प्रभावी उत्तर दिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

यामुळे पुणे शहर भाजपामध्ये चंद्रकांत पाटील यांचे राजकीय महत्त्व कमी झाले आहे का, की शहरातील नेतृत्वाचे केंद्र खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या दिशेने झुकत असल्यामुळे पाटील यांच्या समर्थनार्थ फारशी भूमिका घेतली जात नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीवर उमेदवारी मिळाल्याचे मानले जाणारे काही  नगरसेवक आणि पदाधिकारी देखील या टीकेवर सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नाहीत. शहरातील वरिष्ठ नेतृत्वावर सातत्याने टीका होत असताना भाजपाचे स्थानिक पदाधिकारी शांत का आहेत, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. की अमोल बालवडकर यांच्या टिकांना फारसे महत्त्व न देण्याची भूमिका घेतली जात आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर भाजपाच्या शहर नेतृत्वाची किंवा चंद्रकांत पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे अमोल बालवडकर यांच्या सातत्यपूर्ण टीकेमागील राजकीय परिणाम आणि त्यावर भाजपाची पुढील रणनीती काय असणार, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

See also  भिडे वाड्याची धोकादायक इमारत पुणे महानगरपालिकेने पाडली