अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी भाजपाचे पोलीस आयुक्तांना निवेदन; आंदोलनांना परवानगी न देण्याची मागणी

पुणे, दि. २९ : येत्या १ ऑगस्ट रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर शिष्टमंडळाने बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भेटीत दौऱ्यादरम्यान शहरातील शांतता भंग होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, अशा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांना समान न्याय देत निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या दौऱ्याला राष्ट्रीय महत्त्व असल्याचे नमूद करत, सुरक्षा व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडे केली.

यावेळी भाजपा सरचिटणीस तथा नगरसेवक रवी साळेगावकर, पुनीत जोशी, बापू मानकर, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे, अमर आवळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा मनीषा लडकत, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ तसेच पुष्कर तुळजापूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  रा. स्व. संघ बाणेर बालेवाडी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम