‘व्यसनमुक्त युवा भारत’ पथनाट्य स्पर्धेत ‘भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे’ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे, प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित ‘व्यसनमुक्त युवा भारत’ अभियानांतर्गत पथनाट्य स्पर्धेत भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे येथील विद्यार्थिनींच्या संघाने प्रभावी सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. विविध महाविद्यालयांतील संघांच्या सहभागामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली होती.

व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश दमदार अभिनय, प्रभावी संवाद आणि उत्कृष्ट संघभावनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी प्रभावीपणे सादर केला. त्यांच्या आशयपूर्ण पथनाट्याला परीक्षकांसह उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करत, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या यशासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकरकर आणि डॉ. स्मिता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी सिद्धी, श्रेया, डिंपल आणि आर्या यांनी यशस्वीपणे पार पाडली. तर भार्गवी, प्रीती, भाग्य, नेहा, प्राजक्ता, सांची, श्रावणी, शुभदा, सोनाली, तनिष्का आणि तृप्ती यांनी पथनाट्यात प्रभावी सहभाग नोंदवत महाविद्यालयाला तृतीय क्रमांक मिळवून दिला.

या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

See also  पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे -विभागीय आयुक्त  शितल तेली-उगले