कात्रज-कोंढवा, गंगाधाम चौक आणि नवले पुलाजवळील रस्त्यांच्या कामांना गती; महापालिका आयुक्तांची पाहणी

कात्रज : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेल्या महत्त्वाच्या रस्ते व वाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज पथ विभागाच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम चौकातील नियोजित उड्डाणपूल तसेच वडगाव येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याच्या कामाचा समावेश होता.

दक्षिण पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादनाच्या अडचणीमुळे २०१७-१८ पासून रखडला होता. महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांतून भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने करण्यात आल्याने रस्ता विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे. आता या रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

रस्ते विकासाच्या मार्गात येणारे विद्युत पोल आणि ट्रान्सफॉर्मर एका आठवड्यात स्थलांतरित करण्याच्या सूचना आयुक्तांनी विद्युत विभागाला दिल्या. ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मालमत्ता व व्यवस्थापन विभागाला देण्यात आले.

दरम्यान, अद्याप दहा मिळकतींचे भूसंपादन पूर्ण झाले नसल्याने रस्त्याचे सलग काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या मिळकतींचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विशेष भूसंपादन अधिकारी आणि उपायुक्त, भूसंपादन विभाग यांना देण्यात आले.

रस्ता विकासातील अडथळ्यांची नकाशासहित माहिती असलेला अहवाल तयार करून संबंधित विभागांकडून त्याची पूर्तता करून घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे निर्देश नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नवले पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याचीही पाहणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील राजस चौकाकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलासाठी पुणे महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या कामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

कात्रज-कोंढवा रस्त्याचा विकास आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावरून सासवडच्या दिशेने ये-जा करणाऱ्या जड वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. माऊलीनगर, शेलारमळा, उत्कर्ष सोसायटी, राजस चौक आणि गोकुळनगर परिसरातील वाहतुकीसाठी ग्रेड सेपरेटरचा वापर होणार असल्याने सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूकही अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

See also  'परिवर्तन महाशक्ती' फुंकणार प्रचाराचे बिगूल, छत्रपती संभाजीनगर येथे सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

गंगाधाम चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चौकातील सलग रस्ता करण्यासाठी कलम २०५ अन्वये रस्त्याचे काम सुरू आहे.

मात्र काही मिळकतदारांनी अद्याप जागा ताब्यात दिलेली नसल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत. संबंधित मिळकतदारांशी चर्चा करून तडजोडीच्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

गंगाधाम चौकातील उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर मार्केट यार्ड ते कोंढवा दरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

वडगाव येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याच्या कामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. स्वर्ण हॉटेल ते कुदळे कमानीपर्यंत अंदाजे २०० मीटर लांबीचा रस्ता रखडलेला आहे.

या रस्त्यासाठी आवश्यक जागा मिळविण्याबाबत संबंधित जागा मालकाशी चर्चा करून किंवा तडजोडीच्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. हा रस्ता पूर्ण झाल्यास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

पाहणीदरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, उपायुक्त निखील मोरे, उपायुक्त अरविंद माळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.