बाणेर : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये मुळा, राम नदी पात्रामध्ये नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वृक्षतोड व नदीपात्रातील भराव टाकून सुरू असलेल्या कामाविरोधात नागरिकांच्या वतीने विरोध दर्शवत सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन देण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदी काठावरती नदी सुधार प्रकल्प अंतर्गत औंध बाणेर बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे यासाठी झाडांवर नंबर टाकण्यात आले आहेत. सुमारे पाच हजाराहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत याला पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.
या परिसरात अनेक दुर्मिळ देशी प्रजातीची झाडे आहेत या ठिकाणी अनेक पक्षी स्थलांतरित होऊन येतात. काही पक्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतर करून येत असल्याने या दुर्मिळ पक्षांसाठी ही झाडी महत्त्वपूर्ण आहे असे असताना देखील नदी सुधार कार्यक्रमांतर्गत वृक्षतोड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये निवेदन देण्यात आले तसेच नागरिकांच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करण्यात आल्या.
तसेच बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे परिसरातील कचरा समस्या रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेज लाईन आदी विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. बाणेर बालेवाडी परिसरातील अनेक रखडलेले मुख्य रस्ते तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली.