पुणे : पुणे शहरातील मेट्रो, एचसीएमटीआर, डबलडेकर उड्डाणपूल, उड्डाणपूल, पार्किंग तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित पायाभूत प्रकल्पांचे परस्पर समन्वयाने नियोजन करण्यासह वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत आज दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिका मा.आयुक्त कार्यालय येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत रामवाडी–शिरूर डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पाच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विकास आराखड्यानुसार संरेखन कायम ठेवण्यासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया प्राधान्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. विकास आराखड्यातील संरेखनामधील वळणांमुळे होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक सुधारणा करण्याची शक्यता तपासून ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
खराडी बायपास व वाघोलीनंतरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक चढ-उतार मार्ग, गुंजन चौक येथील भविष्यातील स्तरविभाजन तसेच आव्हाळवाडी फाटा आणि केसनंद फाटा येथील उजवीकडे वळण्यासाठीच्या भुयारी मार्गांबाबत संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.
एचसीएमटीआर व मेट्रोच्या संरेखनाच्या छेदनबिंदूंबाबत रस्त्यांची पातळी, चढ-उतार मार्गाची लांबी, संरचनात्मक व्यवहार्यता तसेच भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन एकात्मिक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.नगर रोड येथील एचसीएमटीआर –मेट्रोची पातळी व चढ-उतार मार्गाची व्यवहार्यता तसेच सिंहगड रोड आणि नवीन विमानतळ मार्गावरील एकाच मार्गिकेवर प्रस्तावित असल्याने पहिल्या पातळीत HCMTR मार्गिका व दुसर्या पातळीवर मेट्रो ठेवण्यात येणार असल्याने विशेष समन्वय करण्याचे ठरविण्यात आले.
वनाज–चांदणी चौक मेट्रो व एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या अनुषंगाने कोथरूड बस डेपो चौकात बसची मोठ्या प्रमाणात यातायात असल्यामुळे चौक येथील डिझाईन करून वहातूक व प्रकल्प विभागा समवेत प्रत्यक्ष तपासण्याचे तसेच चांदणी चौक येथील वाहतूक विलिनीकरणाची व्यवस्था पुणे महानगरपालिके च्या वाहतूक नियोजनानुसार अंतिम करण्याचे ठरविण्यात आले.
मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील पार्किंग आरक्षणे व सुविधा क्षेत्रांबाबत पुणे महानगरपालिकेने केलेला अभ्यास बैठकीत सादर करण्यात आला. प्रवाशांसाठी शेवटच्या टप्प्यातील वाहतूक जोडणी अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक पार्किंग सुविधा विकसित करण्याबाबत पुणे महानगरपालिका आणि महा-मेट्रो यांनी संयुक्तपणे पुढील कार्यवाही करण्यास सहमती दर्शविली. पार्किंग सुविधा ही प्रवाशांच्या सोयीसाठी विकसित करण्यात यावी आणि नफा हा त्यामागील प्राथमिक उद्देश नसावा, यावर उपस्थितांनी एकमत व्यक्त केले.
सोलापूर रोडवरील मेट्रोसोबत एकात्मिक प्रस्तावित डबल डेकर पूल प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पातील भैरोबा नाला, बी. टी. कवडे रोड, ग्लोबल हॉस्पिटल जंक्शन, गाडीतळ जंक्शन आणि मांजरी फाटा या महत्त्वाच्या वाहतूक ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
वाहतूक नियोजन अधिक अचूक आणि परिणामकारक करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडील उपलब्ध गुगल वाहतूक माहिती तसेच महा-मेट्रोकडील वाहतूक नमुना-आधारित माहिती संबंधित यंत्रणांसोबत सामायिक करण्यास सहमती झाली. एचसीएमटीआर तसेच इतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या एकात्मिक वाहतूक नियोजनासाठी उपलब्ध माहितीचा समन्वयाने वापर करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील विविध पायाभूत प्रकल्पांचे परस्पर समन्वयाने नियोजन करणे, भविष्यातील वाहतूक कोंडी व अपघातप्रवण ठिकाणे टाळणे, आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे, हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हार्डीकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वाहतूक विभाग श्री. मनोज पाटील, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे तसेच पुणे महानगरपालिका, महा-मेट्रो आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.















