आंदेशे-मांदेडे रस्त्याची दुरवस्था; पावलोपावली खड्डे, नागरिक त्रस्त

पौड ( यश नवले ) : मुळशी तालुक्यातील आंदेशे-मांदेडे रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पावलोपावली खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुमारे सात किलोमीटरच्या या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.

आंदेशे-मांदेडे हा रस्ता तीन गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः आजारी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय गाठण्यास विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

See also  पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त