पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेची पंढरीत सांगता

पंढरपूर : – भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व शिख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशा सुमारे २१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचा समारोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पंढरीतील श्री विठठल रुक्मिणी मंदिरात झाला . यात्रेचे हे दुसरे वर्ष होते .

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) या जन्मभूमी ते तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या कर्मभूमी पर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , श्री नामदेव दरबार कमिटी घुमान व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती ,समता व बंधूता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती . महाराष्ट्र , मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश , दिल्ली , हरियाणा , पंजाब , राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करुन ही यात्रा शनिवारी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी परतली .


पंढरपूर येथे संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व अभिषेक माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीपसिंह पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यशश्रीदेवी पाटणकर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली .
ही रथ व सायकल यात्रा शनिवार दि . २३ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेली . या यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माउली महाराज जळगांवकर , संभाजीराजे शिंदे , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वर माउली नामदास , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते .

See also  सुसरोड वरून बाणेर कडे जाणारा रस्ता खुला करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्वाक्षरी मोहीम