पुणे : राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांची वाढती वाहतूक आणि ब्रेक फेल किंवा तांत्रिक बिघाडामुळे होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण व तीव्र उताराच्या ठिकाणी Runaway / Escape Ramp उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप पुणे शहर सरचिटणीस व पुणे महानगरपालिका नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. वाहनांचे अचानक ब्रेक फेल होणे, तांत्रिक बिघाड होणे अथवा तीव्र उतारावर वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर जाणे यामुळे अनेकदा भीषण अपघात घडतात. अशा वेळी मुख्य मार्गापासून सुरक्षितपणे वाहन दूर नेऊन नियंत्रित पद्धतीने थांबविण्यासाठी ‘एस्केप रॅम्प’ उपयुक्त ठरू शकतो.
विशेषतः पुणे परिसरातील अपघातप्रवण ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून आवश्यकतेनुसार अशा रॅम्पची सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे साळेगावकर यांनी म्हटले आहे.
देशातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरक्षा ऑडिट व तांत्रिक सर्वेक्षण करून अपघातप्रवण आणि तीव्र उताराच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार Runaway / Escape Ramp उभारण्याबाबत केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
“नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी आधुनिक आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबविणे आवश्यक असून, Runaway / Escape Ramp ही त्यासाठी महत्त्वाची सुविधा ठरू शकते,” असे रविंद्र साळेगावकर यांनी सांगितले.
या सुविधेमुळे ब्रेक फेल किंवा तांत्रिक बिघाड झालेल्या जड वाहनांना सुरक्षितपणे थांबविण्यास मदत होऊन मोठे अपघात टाळण्याबरोबरच वाहनचालक, प्रवासी आणि इतर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे.















