पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सर्वसामान्य लोकांशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. अल्पव्याजदरात कर्ज देवून शेतकऱ्यांचा आर्थिक पाया भक्कम करण्याचे काम बॅंक करते. गृहकर्ज, पर्यटन कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा बॅंकेच्या विविध योजना लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे, असे प्रतिपादन बॅकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी पौड (ता.मुळशी) येथे केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या धर्मादाय निधीतून पत्रकार संघ मुळशीच्या पत्रकार भवनास ग्रंथालयासाठी पन्नास हजार रूपयाचा निधी देण्यात आला. त्याच्या हस्तातंरण प्रसंगी चांदेरे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बंडू दातीर आणि मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी सुवर्णा रमेश ससार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा.सविता दगडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश उभे, सुनिल वाडकर, चंदा केदारी, सचिन अमराळे, दिपक करंजावणे, माऊली कांबळे, सुरेश नागरे, राजेंद्र मारणे, विश्वनाथ जाधव, पत्रकार पप्पू कंधारे आदि उपस्थित होते. पत्रकार धोंडीबा कुंभार, रमेश ससार, विनोद माझिरे, राजेंद्र मारणे, कालीदास नगरे, दिपक सोनवणे, प्रवीण सातव, सागर शितोळे, तेजस जोगावडे, प्रदीप पाटील, साहेबराव भेगडे, रामदास मानकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
चांदेरे पुढे म्हणाले की बॅंक आठ टक्के दराने गृहकर्ज देतो. अल्पव्याजदरात देशांतर्गत वीस आणि देशाबाहेर तीस लाख रूपये कर्ज देतो. गेल्यावर्षीपर्यंत तालुक्यात कर्जवाटप 40 कोटी रूपये झाले होते. यावर्षी ते साठ कोटीच्या पुढे गेले आहे. पत्रकार आणि राजकारणी यांचे जवळचे नाते असते. तालुक्याचे प्रश्न, जनसामान्यांच्या घडामोडी तळागाळात पोचविण्याचे काम पत्रकार करतात.
कोंढरे म्हणाले, की मुळशीतील पत्रकार भवनाच्या उभारणीत समाजातील अनेक दानशूरांचा वाटा आहे. सर्वसामान्य नागरिकांना पीडीसीसी बॅंक माहिती नव्हती. चांदेरे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बॅंक सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचवली आहे. बॅंकेच्या अनेक कर्जयोजना आहे. कमी व्याजाने कर्ज देणारी पीडीसीसी बॅंक आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी.
यावेळी बॅंकेकडून मिळालेल्या पन्नास हजाराच्या धनादेशाचे हस्तांतरण झाले. बंडू दातीर, सुवर्णा ससार यांचा सत्कार करण्यात आला. सुनिल चांदेरे यांचाही विशेष सन्मान केला गेला. राजेंद्र मारणे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन रामदास मानकर यांनी तर आभार दातीर यांनी मानले.