महाळुंगेत खराब रस्त्यांमुळे भीषण अपघात; ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

महाळुंगे : महालुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या या अपघातात ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या मुलगा आणि मुलीसह ट्यूशनसाठी जात होते. तिघेही दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे दुचाकी अचानक घसरली. याचवेळी मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली मुलगा आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

महाळुंगे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, वाहतूक नियंत्रण वाढवावे आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
अपघाताबाबतची पुढील अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

See also  मांडववाले, राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे  फ्लेक्सवर घडते दिखाऊ कारवाई