हिंजवडी : ‘आयटी हब’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्रस्त आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चाला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मूक मोर्चा मध्ये आदित्य ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता.
हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, फुटपाथची दुरवस्था, कचरा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्थेचा अभाव तसेच मेट्रो प्रकल्पाला होत असलेला विलंब यांसारख्या विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने मूक आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चामध्ये हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे हजारो आयटीयन्स तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही या मूक मोर्चात सहभागी होत नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते.
हिंजवडीसारख्या देशातील महत्त्वाच्या आयटी केंद्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असताना त्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र आल्याने हिंजवडीतील हा मूक मोर्चा लक्षवेधी ठरला.















