पुणे, दि. २२ : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बाणेर परिसरातील जलतरण तलावांवर UV (अल्ट्राव्हायोलेट) प्रणाली बसविण्याच्या कामाच्या खर्चावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कामासाठी चार ठिकाणी मिळून तब्बल ३८ लाख १५ हजार ६०० रुपये खर्च झाल्याचा दावा नगरसेवक व पुणे महापालिका स्थायी समितीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी केला आहे.
बालवडकर यांनी संबंधित जलतरण तलावावर प्रत्यक्ष जाऊन UV यंत्रणेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ‘आर्कलाईट’ कंपनीचे कोटेशन दाखवत, कोटेशनमध्ये एका जलतरण तलावासाठी UV प्रणालीची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात एका युनिटसाठी ९ लाख ५३ हजार ९०० रुपये खर्च दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चार ठिकाणी अशा प्रकारे बिले अदा करण्यात आली असल्यास एकूण खर्च ३८ लाख १५ हजार ६०० रुपये होतो. त्यामुळे तुलनेने कमी खर्चात होऊ शकणाऱ्या कामासाठी एवढा मोठा खर्च का करण्यात आला, असा सवाल बालवडकर यांनी उपस्थित केला.
“आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी आम्ही करायची नाही का? हा जनतेच्या पैशांचा विषय आहे. जनतेच्या पैशाची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.
या कामासाठी निविदा प्रक्रिया नेमकी काय होती, खर्चाचे दर कोणी निश्चित केले, संबंधित कंपनीच्या कोटेशनपेक्षा प्रत्यक्ष खर्चामध्ये एवढी मोठी तफावत का आहे आणि कामाची आवश्यकता व मागणी नेमकी काय होती, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
आमदार स्थानिक विकास निधी हा सार्वजनिक पैसा असून, त्याचा वापर पारदर्शक पद्धतीने आणि नागरिकांच्या हितासाठी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून प्रत्यक्ष खर्च, निविदा प्रक्रिया, मंजुरी आणि देयकांची माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील ₹१.५० लाखांचे कोटेशन आणि प्रत्यक्ष ₹९.५३ लाखांचा खर्च याबाबतची कागदपत्रे, निविदा प्रक्रिया तसेच संबंधित बिले यांची अधिकृत पडताळणी झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या आरोपांवर संबंधित प्रशासन व आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय आहे, याकडे आता कोथरूडकरांचे लक्ष लागले आहे.
















