कोणत्या तालुक्यात मतांचे विभाजन अधिक होणार यावर विजयाचे गणित, – भोर वेल्हा मुळशी मतदारसंघ

भोर : भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. प्रामुख्याने चौरंगी मांडल्या जाणाऱ्या या लढतीमध्ये कोणत्या तालुक्यात मतांचे विभाजन अधिक होणार यावर विजयाचे गणित निश्चित मानले जात आहे.

प्रामुख्याने भोर व मुळशी तालुक्यामध्ये मतदारांची संख्या अधिक आहे. भोर तालुक्यातून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना अधिक मताधिक्य राहिले आहे. याच तालुक्यातील अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भोर तालुक्यातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. कुलदीप कोंडे यांनी यापूर्वी दोनदा शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे. तर मुळशी तालुक्यातून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवार म्हणून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच तालुक्यातील भाजपाचे माजी नगरसेवक राहिलेले किरण दगडे यांनी देखील भाजपा शिवसेनेचे बंडखोर उमेदवार म्हणून बंड पुकारत उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे मुळशी तालुक्यात देखील मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपा, संघ व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यावर अपक्ष उमेदवार किरण दगडे यांची भिस्त असल्याने हे मतदार दगडे यांना किती साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर संग्राम थोपटे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्या कार्यकर्त्यांवर तसेच आपल्या गावातील कामांच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्याने यंदाची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून शंकर मांडेकर यांनी मुळशी मधून सर्वाधिक मताधिक्य घेत विजय मिळवण्याचे गणित आपल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे.
मुळशी तालुक्यामध्ये शिवसेनेचे प्राबल्य काही प्रमाणात आहे. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किती साथ देणार तसेच मुळशी तालुक्यातील शिवसैनिक मुळशीच्या स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार का याकडे निवडणुकीत सातत्याने लक्ष वेधले जात आहे.
भोर वेल्हा मुळशी च्या रिंगणामध्ये कोण किती मते घेणार व तालुक्यातील मतांचे विभाजन होऊन त्याचा कोणाला फायदा होणार यावर विजयाची राजकीय गणिते आखली जात असून मतदार कोणाला साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

See also  जी-20 च्या स्वागतासाठी अनधिकृत केबलची रांगोळी? अनाधिकृत केबल मुळे पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान