बालेवाडीतील विकासनिधी शून्य केल्यावरून संताप; अमोल बालवडकर यांना बालेवाडी वेलफेअर फेडरेशनचे समर्थन

बालेवाडी : प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ साठी मंजूर करण्यात आलेला विकासनिधी पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शून्य केल्याच्या मुद्द्यावरून बालेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बालेवाडी रेसिडेन्सी सहकारी गृहरचना वेलफेअर फेडरेशनच्या सदस्यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांची बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांना समर्थन दिले.

यावेळी बालेवाडी परिसरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, क्रीडांगणे, पदपथ, अतिक्रमणे तसेच विविध प्रलंबित विकासकामांबाबत फेडरेशनच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

प्रभागासाठी मंजूर असलेला विकासनिधी शून्य करण्याच्या निर्णयावर फेडरेशनच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी राजकीय कारणातून रोखणे हा बालेवाडी परिसरातील नागरिकांवर अन्याय असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

“बालेवाडीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत आम्ही अमोल बालवडकर यांच्या पाठीशी आहोत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे,” अशी भूमिका फेडरेशनच्या सदस्यांनी यावेळी मांडली.

दरम्यान, बालेवाडीतील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

See also  देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत