पिंपरी : नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी येथे शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी सोशल फाऊंडेशनतर्फे माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे समाजात वकील आणि पोलीस विभागात कार्यरत आहेत अशा मान्यवरांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य श्री. शरद ढोरे सर आणि उपप्राचार्य श्री. सोनवणे सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री. योगेश देशमुख (अॅडव्होकेट व नोटरी), श्री. विवेक कॅदल (अॅडव्होकेट), श्री. संग्राम सावंत (अॅडव्होकेट व नोटरी), श्री. गणेश कांबळे (अॅडव्होकेट), श्री. अमोल चौधरी (पोलीस हवालदार, पुणे) आणि श्री. तुषार काळे (ए.पी.आय., बांद्रा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या शैक्षणिक प्रवासातून आणि व्यावसायिक अनुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, मेहनत, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि ध्येयपूर्तीसाठी सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळाली.
तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विद्यालयातील सर्व शिक्षकांचा माजी विद्यार्थी सोशल फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक श्री. दत्तात्रय खांदवे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लीना मरळ यांनी केले. माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यालय यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेचा आदर्श ठरला. माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनीही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
















