नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २७ : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील ७ पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, त्यापैकी मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी दोन अशा चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे चारही पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून, उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारने टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १०७० तसेच राज्य नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२२-६९१०७६०० उपलब्ध करून दिला आहे. राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून, नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

नेपाळमधील पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे काही भागांतील रस्ते, पूल तसेच दळणवळण व्यवस्था बाधित झाली आहे. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांची माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने समन्वय ठेवून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. परदेशातील आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पर्यटन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच संबंधित जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला आहे.

नेपाळमधील परिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणांशी संपर्क साधावा, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांकडून प्राप्त होणारी माहिती संबंधित यंत्रणांकडून तपासून पुढील मदतकार्य केले जात आहे.

दरम्यान, नेपाळमधील पूरस्थितीत अनेक भारतीय नागरिक आणि पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, भारतीय दूतावास तसेच नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याला राज्य सरकारचे प्राधान्य असून, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शासनाची यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

See also  हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्सपसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी