महाज्योतीकडून युपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश जारी

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाज्योतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या एजन्सीमार्फत परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये १३ हजार १८४ उमेदवारांची १६ जुलै रोजी राज्यातील १०२ आणि दिल्लीतील २ केंद्रावर संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यानी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून सीसीटिव्ही चित्रीकरण तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला असून परीक्षेदरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले आहे.

See also  पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश