कात्रज-गुजरवाडी फाटा रस्ता रुंदीकरणाला वेग; डीपीनुसार मार्किंग करून निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश

पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा या रस्त्याचे रुंदीकरण व विकास करण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी दिले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३८ मध्ये कात्रज चौक ते मांगडेवाडी-सातारा रस्ता परिसराची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली.

सातारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेला मार्ग असल्याने कात्रज ते गुजरवाडी फाटा या रस्त्याचे रुंदीकरण करून तो विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नवीन समाविष्ट गावांच्या हद्दीतील या रस्त्याच्या विकासासाठी बांधकाम विभागाने डीपी नकाशानुसार सर्वेक्षण करून रस्त्याचे डीपी मार्किंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागा भूसंपादन विभागाने ताब्यात घ्यावी, तर पथ विभागाने रस्ता रुंदीकरणाचे सविस्तर अंदाजपत्रक (डिटेल एस्टिमेट) तयार करावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच रस्त्याच्या रुंदीमध्ये येणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करून ती काढण्याबाबतचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. वन विभागाच्या जागेबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याचेही निर्देश देण्यात आले.

रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात येणाऱ्या एमएसईडीसीएलच्या केबल्स भूमिगत करणे तसेच विद्युत खांबांचे स्थलांतर करण्यासाठी पथ विभागाने विद्युत विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही देण्यात आले.

दरम्यान, रस्त्याच्या रुंदीमध्ये पावसाळी लाईन विकसित करण्याचे काम पथ विभागाने करावे. क्षेत्रीय कार्यालयाने रस्त्याच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे हटवावीत. त्यानंतर कात्रज ते गुजरवाडी फाटा रस्ता रुंदीकरणासाठी परिपूर्ण अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले.

या पाहणीवेळी पुणे मनपाचे सभासद व्यंकोजी खोपडे, प्रतिभाताई चोरघे, संदीप बेलदरे, युवराज बेलदरे तसेच पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अजय वायसे, कार्यकारी अभियंता सुरेश साखळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर, धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त सुरेखा भणगे, पथ विभागाचे उपअभियंता व्यंकटेश इंद्राक्षे, भूसंपादन विभागाचे उपअभियंता दिगंबर बांगर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड "दादाची शाळा" या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी.ई.ए.फंड 'रिझर्व बँक आँफ ईंडियाच्या अंतर्गत "आर्थिक साक्षरतेची" कार्यशाळा