पुणे-जर्मनी शहरांमध्ये धोरणात्मक सहकार्याला चालना; MSME, स्टार्टअपना युरोपियन बाजारपेठेची दारे खुली

पुणे : पुणे महानगरपालिका आणि जर्मनीतील फ्रँकफर्ट राईन-माईन प्रदेशातील शहरांदरम्यान शहरी विकास, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्टार्टअप परिसंस्था आणि MSME विकासाच्या क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य निर्माण करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या सहकार्यामुळे पुण्यातील MSME आणि स्टार्टअप उद्योगांना जर्मनीसह युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जर्मनीतील रौनहाईम, रुसेल्सहाईम आणि केल्स्टरबाख या शहरांच्या प्रतिनिधींसह जर्मन-इंडियन बिझनेस अलायन्स (GIBA) च्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेला भेट देऊन महापालिका प्रशासनासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

पुणे आणि जर्मनीतील शहरांदरम्यान City-to-City तसेच Twin-City भागीदारी विकसित करणे, शहरी व्यवस्थापनातील जर्मन अनुभव पुण्यात राबविणे आणि पुण्यातील उद्योगांना युरोपियन बाजारपेठेशी जोडण्यासाठी व्यावसायिक संधी निर्माण करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

बैठकीत MSME विकास व युरोपियन बाजारपेठेत प्रवेश, कचरा व्यवस्थापन व Circular Economy, शहरी नियोजन व पायाभूत सुविधा तसेच शहरी वाहतूक व परिवहन व्यवस्था या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर भर देण्यात आला.

पुण्यातील MSME साठी १२ महिन्यांचा विशेष कार्यक्रम : पुण्यातील निवडक MSME उद्योगांना जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी जर्मन शिष्टमंडळाने १२ महिन्यांचा विशेष European Market Access Program प्रस्तावित केला आहे.

या कार्यक्रमामध्ये बाजारपेठेचे मूल्यांकन, संभाव्यतेचा अभ्यास, युरोपियन बाजारपेठेसाठी प्रवेश धोरण तयार करणे, जर्मनीत व्यवसायाची स्थापना व विस्तारासाठी मार्गदर्शन, संभाव्य ग्राहक व व्यावसायिक भागीदारांशी संपर्क तसेच तंत्रज्ञान आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

यामुळे पुण्यातील लघु व मध्यम उद्योगांना केवळ स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता युरोपियन बाजारपेठेत व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते.

कचरा व्यवस्थापन आणि Circular Economy क्षेत्रातही दोन्ही बाजूंमध्ये सहकार्याबाबत चर्चा झाली. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर, Waste-to-Energy, बायोगॅस, शाश्वत कचरा प्रक्रिया आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांसारख्या क्षेत्रात जर्मन तंत्रज्ञान व सर्वोत्तम पद्धतींचा पुण्यात वापर करण्याच्या शक्यतांवर विचार करण्यात आला.

See also  पुणे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र आणि राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राच्यावतीने “वन्यजीव सप्ताह”

महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी जर्मन शिष्टमंडळाचे स्वागत करताना पुणे आणि जर्मनी यांच्यातील संबंधांना अधिक व्यापक आणि परिणामकारक सहकार्याची जोड देण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे सांगितले.

“तंत्रज्ञान, शहरी विकास, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन भागीदारी विकसित करण्यास पुणे महानगरपालिका उत्सुक आहे. या सहकार्यामुळे शाश्वत शहरी विकासाला चालना मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.

जागतिक अनुभवातून पुण्याच्या विकासाला बळ मिळेल” – आयुक्त नवल किशोर राम

महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, IAS यांनी पुण्याकडे शिक्षण, IT, स्टार्टअप, उत्पादन उद्योग आणि कुशल मनुष्यबळाची मजबूत परिसंस्था असल्याचे सांगितले.

“तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि उद्योग क्षेत्रात जर्मनीने भारतासाठी सातत्याने मार्गदर्शक भूमिका बजावली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, शहरी प्रशासन, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि शहर नियोजन या क्षेत्रांमध्ये जर्मन शहरांसोबत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुण्याच्या विकासाला अधिक बळ मिळू शकते,” असे आयुक्त राम यांनी सांगितले.

या बैठकीनंतर सहकार्याची ठोस क्षेत्रे निश्चित करणे, संयुक्त कार्यक्रमांची रूपरेषा तयार करणे आणि दोन्ही बाजूंच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

बैठकीस जर्मन शिष्टमंडळाकडून रौनहाईमचे महापौर डेव्हिड रेंडेल, राईन-माईन इनोव्हेशन हबचे CEO स्टीफन विटेकिंड, GIBAचे अध्यक्ष सेल्वाकुमार पेरियासामी, CEO निर्मल रामन कक्षैयन आणि Expandeersचे भारतातील भागीदार चारुदत्त पांडे उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेकडून महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे, महापालिका सचिव योगिता भोसले आणि अधीक्षक अभियंता विपिन शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या प्रस्तावित भागीदारीमुळे पुण्याला जर्मनीतील शहरी विकासाच्या आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार असून, दुसरीकडे पुण्यातील MSME, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्राला युरोपियन बाजारपेठेशी जोडण्याचा नवा मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.