कोथरूड : कोथरूड प्रभाग क्र. ११ मधील केळेवाडी येथे सुरू असलेल्या SRA पुनर्वसन प्रकल्पाच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. मे. कुमार सिन्यू डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असून, संबंधित विकासकाकडून स्थानिक नागरिकांवर घरे खाली करण्यासाठी दबाव, दमदाटी आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत नगरसेविका आणि पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष दिपाली संतोष डोख यांनी पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
सौ. डोख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या कार्यालयाकडे स्थानिक नागरिक आणि संबंधित लाभार्थ्यांकडून अनेक लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष करारनामा झालेल्या लाभार्थ्यांवर देखील दबाव आणून, दमदाटी करून घरे खाली करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.”
पुनर्वसन प्रकल्पाची अंमलबजावणी करताना संबंधित लाभार्थी व रहिवाशांचे कायदेशीर हक्क अबाधित राहणे, त्यांना आवश्यक ती पूर्वसूचना व कायदेशीर प्रक्रिया पाळणे तसेच कोणत्याही प्रकारे दबाव, धमकी अथवा बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन SRA प्रशासनाने तात्काळ चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा आणि दोषी विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.















