महाळुंगे गावातील रस्त्यावर ट्रकला धडकून २६ वर्षीय श्रीहरीचा मृत्यू; एका महिन्याच्या आत दोन जणांना गमवावे लागले प्राण, नागरिकांमध्ये संताप

महाळुंगे : महाळुंगे येथील VTP Alpine सोसायटीमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय श्रीहरी यांचा महाळुंगे गावातील रस्त्यावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीहरी हे निकमार कॉलेजमध्ये एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते.

रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परतत असताना निसरड्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरून पडली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात श्रीहरी यांचा मृत्यू झाला.

महाळुंगे गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत दोन मुलांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी याच रस्त्यावर एका ११ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत प्रशासनाविरोधात आंदोलने केली होती.

रस्त्यांची दुरवस्था आणि महाळुंगे परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यावेळी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद होत्या. आणखी किती जणांचे प्राण गेल्यानंतर प्रशासन कार्यवाही करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

See also  मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा एक दिवस अन्नत्याग