अधिकमास परंपरेला नवा सामाजिक अर्थ; बालेवाडीत अनिल बालवडकर यांच्याकडून सासऱ्यांचा गौरव

पुणे, ता. ७ जून : अधिक मासानिमित्त जावयांना घरी जेवणासाठी निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या परंपरेत जावयांना गोडधोड भोजन देऊन सोन्याची अंगठी किंवा अन्य भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, बालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बालवडकर यांनी या परंपरेला नवा सामाजिक दृष्टिकोन देत एक आदर्श उपक्रम राबविला.

अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या कौटुंबिक स्नेहभोजनात त्यांनी आपल्या जावयांसह स्वतःचे सासरे आणि दोन्ही मुलांच्या सासऱ्यांनाही विशेष निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिला.

याबाबत बोलताना अनिल बालवडकर म्हणाले, “सासऱ्यांनी त्यांची मुलगी म्हणजेच त्यांच्या काळजाचा तुकडा आपल्यावर विश्वास ठेवून आयुष्यभरासाठी आपल्या स्वाधीन केलेला असतो. अशा व्यक्तीकडून एखादा धातूचा तुकडा घेण्यापेक्षा त्यांचा सन्मान करणे हे अधिक योग्य आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांना मान देणे हीच खरी संस्कृती आहे.”

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या त्यांच्या भाची नीलम बोऱ्हाडे तसेच शिवव्याख्याते राकेश पिंजण यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाजासाठी हा एक प्रेरणादायी संदेश असल्याचे सांगितले.कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये परस्पर सन्मान, कृतज्ञता आणि मुलीच्या आई-वडिलांविषयी आदरभाव वाढविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. अधिक मासाच्या निमित्ताने मुलीच्या वडिलांचा सन्मान करून अनिल बालवडकर यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
“जावयाचा मान राखताना मुलीच्या वडिलांचाही सन्मान व्हावा,” हा संदेश देणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

See also  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन