बाणेर–बालेवाडी–सुस–म्हाळुंगे परिसरातील नागरी समस्यांवर पूनम विशाल विधाते यांचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

पुणे : बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे तसेच परिसरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने सुरू असलेले नागरीकरण, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीसह रस्ते, खड्डे, कचरा, मिसिंग लिंक, अपूर्ण रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विविध समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी पूनम विशाल विधाते यांनी केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पूनम विशाल विधाते यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले.

बाणेर–बालेवाडी– सुस–म्हाळुंगे हा परिसर पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, आयटी, व्यावसायिक तसेच निवासी क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. मात्र, या वाढत्या विकासाच्या तुलनेत रस्ते व वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना दररोज मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे.

निवेदनामध्ये परिसरातील खराब रस्ते आणि मोठमोठे खड्डे तातडीने बुजविणे, दर्जेदार डांबरीकरण करणे, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे, अपूर्ण रस्ते व मिसिंग लिंकची कामे प्राधान्याने पूर्ण करणे तसेच रखडलेल्या विकासकामांना निश्चित कालमर्यादा देणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते, वाहतुकीतील अडथळे आणि पर्यायी मार्गांची अपुरी व्यवस्था यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधून कामांचा आढावा घेण्यात यावा आणि कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

परिसरातील काही ठिकाणी कचरा संकलनाची अनियमितता आणि अस्वच्छता दिसून येत असल्याने नियमित कचरा संकलन, स्वच्छता मोहीम आणि कचरा टाकण्याच्या ठिकाणी प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी फुटपाथ, पादचारी मार्ग, स्ट्रीट लाईट, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल व्यवस्था आणि आवश्यक ठिकाणी स्पीड कंट्रोल यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

See also  निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा

निवेदनाची तातडीने दखल; संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश
पूनम विशाल विधाते यांनी सादर केलेल्या निवेदनाची मा. सौ. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी तातडीने दखल घेतली. बाणेर–बालेवाडी–सुस–म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, मिसिंग लिंक, अपूर्ण रस्ते, कचरा व्यवस्थापन तसेच मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्यांची माहिती त्यांनी गांभीर्याने जाणून घेतली.

या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना निवेदनातील मागण्यांवर तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी तत्काळ दिले. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या सकारात्मक दखलीमुळे बाणेर–बालेवाडी– सुस–म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नांना आता प्रशासनाकडून गती मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी पूनम विशाल विधाते म्हणाल्या, “बाणेर–बालेवाडी –सुस–म्हाळुंगे हा पुण्याच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. या परिसराचा विकास वेगाने होत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था त्याच वेगाने सक्षम होणे गरजेचे आहे. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून आपला अमूल्य वेळ गमवावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे केवळ तात्पुरता उपाय म्हणून न पाहता कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध उपाययोजना होणे आवश्यक आहे.”

“आम्ही मांडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल. बाणेर–बालेवाडी–सुस–म्हाळुंगे परिसराचा सुरक्षित, सुटसुटीत, नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही पूनम विशाल विधाते यांनी सांगितले.

नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक दखल घेऊन संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश दिल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण होईल .