मुळशी, पौड | प्रतिनिधी :मुळशी तालुक्यातील धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासन, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) मुळशी तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार विजयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यातील अनेक मागण्यांबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन टाटा पॉवरच्या प्रतिनिधींनी दिले.
माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. मुळशी धरणातून पिण्याच्या तसेच शेतीच्या वापरासाठी दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत जलसंपदा विभागाकडून आवश्यक प्रस्ताव मागवून पुढील कार्यवाही करण्याची माहिती देण्यात आली.
धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे गावठाण मिळावे, यासाठी टाटा कंपनीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावर कंपनीच्या प्रतिनिधींनी नऊ गावांच्या गावठाणाबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले.
माले येथील सेनापती बापट विद्यालयातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच एकर जागा उपलब्ध करून देणे, तसेच यासाठी असलेल्या ७५ लाख रुपयांच्या निधीचा योग्य वापर करण्याबाबत चर्चा झाली. धरणग्रस्त गावांतील ग्रामपंचायतींना टाटा कंपनीच्या सीएसआर निधीतून मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
मुळशी धरणग्रस्तांच्या गेल्या १०५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विस्थापनाच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच माण व हिंजवडी परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टाटा कंपनीकडून पाणी उपलब्ध करून देणे, पावसाळ्यात बंद होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, कातकरी समाजातील नागरिकांना घरकुल व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामपंचायत हद्दीतील जमिनींच्या प्रश्नांवर तोडगा काढणे, या विषयांवरही चर्चा झाली.
धरणग्रस्त गावांतील रस्ते, समाजमंदिरे, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी कंपनीने सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. माले येथील आरोग्य केंद्रात टाटा कंपनीच्या सहकार्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, मुळशी-माले परिसरातील वीज वितरण व्यवस्था सुधारणे, मुलांसाठी क्रीडांगण व बाग उपलब्ध करून देणे आणि स्थानिक तरुणांना टाटा कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय मुळशी-वाघवाडी पूल, तसेच हिंजवडी आयटी पार्कच्या माध्यमातून मुळशी तालुक्याच्या विकासासाठी टाटा कंपनीच्या सीएसआर निधीतून २० टक्के निधी उपलब्ध करून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली.
इतर मागण्यांबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे टाटा पॉवरच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. बैठकीत झालेल्या चर्चेतील सर्व मुद्द्यांवर प्रस्ताव तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येतील आणि त्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.दरम्यान, बैठकीतील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि पुढील बैठक आयोजित करावी, अशा सूचना तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य शिवाजी राजाराम बुचडे, अमित कंधारे, टाटा पॉवरचे अजय कोणणूर, श्रीकांत कंदी, आकाश धनवट, वारकचे सरपंच संतोष भिलारे, वांद्रेचे सरपंच रमेश पडवळ, संजय हुंडारे, सचिन कोंढाळकर, विठ्ठल पडवळ यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















