पाषाण-सुस रस्त्यावर मैलापाणी; ड्रेनेज दुरुस्तीसाठी मनसेची मागणी

पुणे : पाषाण-सुस रस्त्यावरील बालाजी चौक परिसरात सी.एन. पेट्रोल पंपासमोरील मुख्य ड्रेनेज लाईन गेल्या एक ते दोन महिन्यांपासून वारंवार तुंबत असून, त्याचे मैलापाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ड्रेनेजमधून वाहणारे मैलापाणी उताराच्या दिशेने शुभतेज मंगल कार्यालयापर्यंत वाहत जाते. त्यामुळे रस्त्यावर शेवाळ साचून रस्ता निसरडा झाला असून, दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खोलगट भागात मैलापाणी साचत असल्याने विद्यार्थी, रहिवासी आणि नागरिकांना या ठिकाणाहून ये-जा करणेही धोकादायक व कसरतीचे झाले आहे.

साचलेल्या दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्येला कंटाळून परिसरातील अनेक नागरिकांनी मनसेच्या कार्यालयात येऊन तक्रारी केल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, या समस्येबाबत पुणे महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता संबंधित विभागाने तातडीने ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या आठ दिवसांत ड्रेनेजची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, निलेश जुनवणे, पांडुरंग सुतार, गोपाळ जाधव, अशोक मराठे, प्रेमनाथ उमप, राजेंद्र फुके, संदेश कांबळे आणि किशोर इंगवले उपस्थित होते.

See also  महिलांवरील अत्याचार आणि महागाईचे उत्तर द्या ?- महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना सवाल