MNGL च्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान आणि स्वावलंबी महिलांचा सन्मान

पुणे: “महिला सक्षमीकरण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, जेव्हा समाजाच्या शेवटच्या घटकातील स्त्री सन्मानाने उभी राहते, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती होते,” हाच संदेश देत ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात एमएनजीएलच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान  महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या विशेष प्रसंगी बीपीसीएल (BPCL) च्या ‘मॅक (MAK) लुब्रिकंट’चा देखील मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एमएनजीएलच्या सीएनजी पंपांवर काम करणाऱ्या महिला कर्मचारी, पीएमपीएमएलच्या महिला बस कंडक्टर, महिला पत्रकार यांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेण्यात आली. केवळ कॉर्पोरेट जबाबदारी म्हणून नव्हे, तर सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने एमएनजीएलने या कर्तृत्ववान महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

सन्मानित झालेल्या महिलांमध्ये अशा काही भगिनींचा समावेश होता, ज्यांनी स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजातील कुप्रथांविरुद्ध लढा दिला किंवा पर्यावरणासाठी योगदान दिले. त्यांच्या अनुभव ऐकून उपस्थित सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटला.

यामधील पीएमपीएमलच्या बस कंडक्टर मिताली देशमुख म्हणाल्या, “आज MNGL च्या वतीने आमचा सन्मान होत आहे, ही एकप्रकारे आमच्या कामाची पोचपावतीच आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जेव्हा मी घराबाहेर पडून काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक टप्प्यांवर मोठा संघर्ष करावा लागला. कंडक्टर म्हणून काम करते म्हणून हिणवले जात होतं मात्र, त्या संघर्षाचा धैर्याने सामना करून आज मी कुटुंबाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलत आहे,  आज जेव्हा मी प्रवाशांना तिकीट देते किंवा गर्दीच्या बसमध्ये शिस्त राखते, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत एक विश्वासाची भावना दिसते. विशेषतः महिला प्रवाशांना माझ्या उपस्थितीमुळे सुरक्षित वाटते, याचा मला अभिमान वाटतो.”

रिक्षाचालक महिला सोनी शेंडगे म्हणाल्या, “समाजात रिक्षा चालवण्याच्या व्यवसायाला अनेकदा कमीपणाचा मानला जातो. मी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुरुवातीला मला घरातूनही विरोध झाला. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम राहून काम करत राहिले. जेव्हा पुण्याची पहिली महिला रिक्षाचालक म्हणून माझा गौरव झाला, तेव्हा मात्र माझ्या कुटुंबीयांनाही माझ्या जिद्दीचा आणि निर्णयाचा सार्थ अभिमान वाटला.”

See also  पत्रकार कृष्णकांत कोबल यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे विभागाच्या आयकर अतिरिक्त आयुक्त श्रीमती मुग्धा सरदेशपांडे म्हणाल्या की, “प्रत्येक महिलेने स्वतःमधील ‘स्व’ ओळखला पाहिजे. महिला केवळ कुटुंबासाठीच नाही, तर समाजाच्या जडणघडणीतही मोलाचे योगदान देतात. तुम्ही खऱ्या अर्थाने बदलाचे प्रतिनिधित्वकरता. त्यामुळे सर्व महिलांनी स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासोबतच, कुटुंबात समानता प्रस्थापित करण्यावर आणि ‘आर्थिक साक्षरतेवर’देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे.” अशी भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना एमएनजीएलच्या इंडिपेंडट डायरेक्टर श्रीमती बागेश्री मंठाळकर म्हणाल्या की, “आजच्या महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत. स्त्रिया मुळातच संवेदनशील असतात, तरीही सामाजिक, बौद्धिक आणि आर्थिक अशा सर्वच स्तरांवर त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निर्मला सीतारामन, ज्यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. आजही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांवर अधिक विश्वास व्यक्त केला जातो. म्हणूनच, महिलांनी समाजाला सकारात्मक योगदान दिल्यास, त्याचा परतावादेखील तितकाच सकारात्मक मिळेल.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बी पी सि एल चे टी एम श्री धिरेंद्र गौतम, एम एन जी एल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर व कमर्शियल डायरेक्टर मेजर शंकर करजगी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

या सोहळ्याने समाजाला हेच अधोरेखित करून दिले की, सन्मान हा केवळ पदाचा नसून तो कष्टाचा आणि जिद्दीचा असतो. या कार्यक्रमाला आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे, एमएनजीएलच्या इंडिपेंडट डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, बी पी सि एल चे टी एम धिरेंद्र गौतम, एम एन जी एल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर व डायरेक्टर कमर्शियल मेजर शंकर करजगी यांच्यासह एमएनजीएलचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, याप्रसंगी, महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) आपल्या सीएनजी (CNG) स्टेशनवर बीपीसीएलच्या ‘मॅक लुब्रिकंट’चा औपचारिक शुभारंभ केला.