बाणेर मधील मालपाणी व्हेंचर्सला विनापरवाना रस्ते खोदाईप्रकरणी ५.४८ कोटींचा दंड; दंड वसुली आणि बांधकामे थांबविण्याची पथ विभागाचे मागणी

पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३/१/९ मधील बांधकाम प्रकल्पासाठी विनापरवाना विद्युत केबल टाकण्याकरिता रस्ते खोदाई केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने मालपाणी व्हेंचर्सला ५ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. आम आदमी पार्टीने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा आप युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केला आहे.

यापूर्वी बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक २३ मधील बांधकाम प्रकल्पासाठी विनापरवाना रस्ते खोदाई केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाला १ कोटी २८ लाख १ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने वसूल केल्याचे काळे यांनी सांगितले.

बाणेर येथील प्रकरणात नव्याने आकारण्यात आलेला दंडही तातडीने वसूल करावा, अशी मागणी आपकडून करण्यात आली आहे. दंड भरण्यास टाळाटाळ झाल्यास पुणे शहरातील मालपाणी व्हेंचर्सच्या सुरू असलेल्या बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस (वर्क स्टॉप नोटीस) देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पथ विभागाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बांधकाम विकास विभागाच्या (आयटी विभाग) कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविल्याचे काळे यांनी नमूद केले.

अन्य प्रकल्पांचीही चौकशी करा
संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या पुणे शहरातील अन्य सुरू असलेल्या प्रकल्पांची चौकशी करून तेथेही विनापरवाना विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्यात आली आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. या प्रकरणात कोणाकडून संबंधित व्यावसायिकाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विनापरवाना रस्ते खोदाईमुळे महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत, नव्याने आकारलेल्या दंडाची वसुली आणि संबंधित प्रकल्पांवरील कारवाईबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आम आदमी पार्टीने मांडली आहे.
— रविराज बबन काळे
प्रदेशाध्यक्ष, आप युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य

See also  मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्यकेंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित – उपमुख्यमंत्री अजित पवार