पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळ्या निमित्त आयोजित प्रदर्शनाचे  शुभारंभ

पुणे : राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन व सोहळा २०२६ चा गुरुवारी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (APCOER), पर्वती येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. ‘काँक्रीटमधील नवकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत भारताची उभारणी’ ही यंदाच्या सोहळ्याची संकल्पना असून, या कार्यक्रमात ३,००० हून अधिक विद्यार्थी, अभियंते, उद्योग प्रतिनिधी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

या प्रदर्शनात शंभरहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग असून विद्यार्थ्यांनी काँक्रीट, बांधकाम तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रकल्प सादर केले आहेत. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांना प्रत्यक्ष उद्योगातील तंत्रज्ञान व प्रक्रियांचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

उद्घाटन समारंभास ABMSP, पुणेच्या सरचिटणीस श्रीमती प्रमिला गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी MKVDC, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ, MIT-WPUच्या Principal Advisor डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, ABMSPचे खजिनदार श्री. धैर्यशील वांडेकर, अॅड. भगवानराव साळुंखे, पुणे RMC असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रदीप वाल्हेकर, अभियंता युसूफ ए. एस. इनामदार, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक, पुणे RMC असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन काटे यांच्यासह ICI, IGS, MBVA तसेच विविध शैक्षणिक व उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काँक्रीटच्या वाढत्या गरजा आणि शाश्वत बांधकामाची आवश्यकता लक्षात घेऊन ग्रीन काँक्रीटसह विविध प्रकारच्या काँक्रीट तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पाहता व समजून घेता येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प व तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात तांत्रिक परिसंवाद, ज्ञानविनिमय सत्रे आणि उद्योग–विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. काँक्रीट तंत्रज्ञान, बांधकाम, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि सुरक्षितता यांसारख्या आधुनिक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते Construction & Infrastructure Exhibition चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी सहभाग घेतला असून, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादने, यंत्रसामग्री, उपकरणे, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

See also  'परिवर्तन महाशक्ती' च्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न ; कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना

यामध्ये रेडी-मिक्स काँक्रीट व काँक्रीट तंत्रज्ञान, बांधकाम यंत्रसामग्री, काँक्रीट पंप व बॅचिंग सोल्युशन्स, बांधकाम रसायने, अत्याधुनिक बांधकाम उपकरणे, शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान, संरचनात्मक अभियांत्रिकी व सुरक्षितता, विनाशविरहित चाचणी (NDT), डिजिटल बांधकाम व AI तंत्रज्ञान तसेच पायाभूत सुविधा विकासासाठीच्या विविध उपाययोजनांचा समावेश आहे.

राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळ्याच्या माध्यमातून शासन, अभियंते, RMC उत्पादक, कंत्राटदार, विकासक, वास्तुविशारद, सल्लागार, उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, ज्ञानविनिमय आणि उद्योगातील नव्या संधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे.

भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित बांधकाम पद्धतींची गरज असून, या प्रदर्शनातून नवकल्पना व कौशल्य विकासाला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा दोन दिवसीय सोहळा ११ सप्टेंबर २०२६ रोजीही सुरू राहणार असून, तांत्रिक सत्रे, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, प्रदर्शन, उद्योग संवाद, पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.