कात्रज : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कार, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव! याच उत्सवाचे पावित्र्य जपत आपल्या प्राईड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘डीजे मुक्त गणेशोत्सवा’ची शपथ घेतली.
‘उत्सव आपला, जबाबदारी आपली’,, ‘धांगडधिंगाणा नको, भक्ती हवी; गणरायाची शक्ती हवी’, ‘डीजेचा दणदणाट नको; गणरायाचा मंगलनाद हवा’, अशा घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती केली. मोठ्या आवाजातील डीजेला प्रोत्साहन न देता पारंपरिक वाद्ये, भजन, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची, तसेच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
यासोबतच ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर , विराज खटावकर , आप्पा रेणुसे ,लोकमतचे पांडुरंग मरगजे आणि मुख्याध्यापिका शर्मिला पांडे यांच्या विशेष उपस्थितीत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळाही घेण्यात आली. स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि संस्कारांचा संदेशही आत्मसात केला.
‘मातीचा बाप्पा, पर्यावरणाची राखण आणि संस्कारांचा गणेशोत्सव’ हा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
गणेशोत्सवातील संस्कारांची सुरुवात घरातून होतेच; पण ती शाळेतून आणि विद्यार्थ्यांच्या मनातूनही रुजली, तर भविष्यातील उत्सव अधिक सुंदर, शांत आणि पर्यावरणपूरक होऊ शकतो, हाच उद्देश या उपक्रमामागे होता. यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
















