पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून पुणे शहरातील विविध रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला.
या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अपूर्ण रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, फुटपाथ तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बालवडकर म्हणाले, “माझ्या प्रभागातील नांदे-म्हाळुंगे रस्त्यावरही अपघातांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अपघातग्रस्त तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत व भरपाई देण्यासाठी महानगरपालिकेचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”
PMPML अपघातग्रस्ताला १२ लाखांचा खर्च, मदत मात्र केवळ ५० हजारांची
२० ऑगस्ट रोजी झालेल्या PMPML बसच्या अपघातात एका सायकलस्वाराचा हात गंभीर जखमी झाला. त्याच्या उपचारासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च झाले. मात्र PMPML प्रशासनाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नसल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अपघातग्रस्ताला केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्तांना कायद्यानुसार मदतीची तरतूद असताना महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन अपघातग्रस्त नागरिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचेही बालवडकर यांनी सांगितले.
“आज मुख्य सभेत हे सर्व प्रश्न मांडणार होतो. मात्र मला जाणूनबुजून बोलण्याची संधी देण्यात आली नाही. याचा मी तीव्र निषेध करतो,” असा आरोपही बालवडकर यांनी केला.
पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण कामे आणि अपघातांच्या वाढत्या घटना पाहता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात. पुणेकरांच्या जीवाशी खेळ थांबवून रस्ते सुरक्षित करावेत तसेच अपघातग्रस्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ठोस मदत व भरपाईचे धोरण तातडीने निश्चित करावे, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.
















