बावधन : बावधन परिसरातील RMC (Ready Mix Concrete) प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला संभाव्य धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह परवाना विभाग, कर आकारणी विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संबंधित प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान संबंधित प्लांट चालकांकडे आवश्यक परवानग्या व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केला आहे.
मागील सर्वसाधारण सभेत प्रशासनासमोर संबंधित RMC प्लांटच्या परवानग्या आणि कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्लांटच्या मशीनरीचा परवाना, महापालिका कर भरणा, बांधकाम परवानगी, जागेचा मंजूर वापर तसेच आवश्यक NOC व इतर वैधानिक परवानग्या आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगरसेवक किरण दगडे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचे पाटील यांनी सांगितले.आठ दिवसांची मुदत; कागदपत्रे नसल्यास प्लांट सील करण्याची मागणी
नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका किरण दगडे पाटील यांनी घेतली आहे. संबंधित प्लांट चालकांना आवश्यक परवानग्या व कागदपत्रे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत, तर प्रशासनाने नियमाप्रमाणे तातडीने कारवाई करून RMC प्लांट सील करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आवश्यक परवानगी नसताना कोणताही व्यवसाय सुरू ठेवता येणार नाही. नियम सर्वांसाठी समान असून प्रशासनाने कोणाचाही दबाव किंवा मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. आठ दिवसांची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही, तर कायदेशीर मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“पर्यावरणाचा विषय केवळ कागदावर नको; बावधनच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रत्यक्ष आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे किरण दगडे पाटील यांनी स्पष्ट केले.















