खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ‘पुणे ऑन सायकल रॅली’, ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राच्या वतीने ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली, तसेच ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून निघून कर्वे रोड मार्गे डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पुन्हा बालशिक्षण मंदिर अशी समाप्त झाली.

या रॅलीच्या निमित्ताने 150 गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. सुमारे पाच हजार पुणेकर या सायकल रॅली व वॉकेथाॅनमध्ये सहभागी झाले होते. प्रसंगी माजी नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गिर्यारोहक गणेश आगाशे, खोखो प्रशिक्षक पुष्कर बर्वे, खोखो पुरस्कार विजेती राखी बर्वे, आयर्नमन स्पर्धा विजेते कुणाल आणि मीनल काशीकर, निवृत्त पोलीस अधिकारी विष्णु ताम्हाणे, क्लायंबर रुद्र करंदीकर व किया रेवणकर, क्रीडा छायाचित्रकार नितीन खानोलकर, अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते प्रशांत व मेधा जोग यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

अमितेश कुमार म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही सक्रिय सहभाग नोंदवावा. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर भर देतानाच, येत्या काळात सायकल प्लॅनच्या माध्यमातून सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्य नागरिक, महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.”

प्रास्ताविकात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे यंदाचे सातवे वर्ष आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मोदीजी काम करीत आहेत. त्यांच्या या उदात्त कार्याला कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे.”

See also  शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स तयार कराव्या - आमदार सिद्धार्थ शिरोळे

जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश मिसाळ, जान्हवी जोशी, यामिनी मठकरी, निनाद पटवर्धन, गिरीश डोंगरे, कल्याणी टोकेकर, अमित पागे, शैलेश संचेती, प्रकाश तापकीर, अमेय कोकाटे, लोकेश राणे, दिनेश मुंडे, दिपाली मोहिते, तेजस गुप्ता या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.