बाणेर : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील प्रभाग क्रमांक ९ मधील सुशिक्षित तरुण आणि Gen Z उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ बाणेरमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून करण्यात आला. शरद पवार यांनी आघाडी तोडत विशेष उमेदवारी दिलेल्या जयेश मुरकुटेंच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या वेळी मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतकांसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले, तर महिला भगिनींनी औक्षण करून उत्साहात स्वागत केले. गावठाण भागासोबतच नोकरदार व सोसायटी वर्गातूनही जयेश मुरकुटेंना विशेष पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
सुशिक्षित, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले, प्रश्नांवर ठोस विचार करून कृती करणारे आणि चालू घडामोडींवर जाहीरपणे भाष्य करणारे नेता म्हणून जयेश मुरकुटेंनी अल्पावधीतच प्रभागात लोकप्रियता मिळवली आहे. चुकीच्या गोष्टींवर ठामपणे बोट ठेवून जाब विचारण्याचे धाडस त्यांनी दाखवल्यामुळे विविध स्तरांतून त्यांच्याकडे आकर्षण वाढले असून व्यापक पाठिंबा मिळत आहे. मेळाव्याला माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांनी उपस्थिती लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयेश मुरकुटेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट केले. तसेच खासदार निलेश लंके आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा प्रचारातील सहभाग यामुळे जयेश मुरकुटे यांची ताकद वाढली आहे.
“परिवर्तन घडवूया, जयेश निवडूया” या घोषवाक्याने प्रचार करत, पॅनल नसतानाही जयेश मुरकुटेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रचारात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्तम निवडणूक व्यवस्थापन, QR कोडद्वारे कार्यअहवाल पोहोचवणे, तसेच प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांचा संतुलित वापर यामुळे त्यांचा प्रचार वेगळा ठरत आहे.
या घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मातब्बर उमेदवारांनाही जयेश मुरकुटेंची दखल घ्यावी लागत असून, त्यानुसार रणनीतीत बदल करावा लागत असल्याचे चित्र प्रभागात दिसत आहे. एकूणच, जयेश मुरकुटेंमुळे प्रभाग ९ ची लढत अत्यंत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.























