पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श; सातव्या दिवशी घरच्या घरी गणेशमूर्ती विसर्जन

थेरगाव : पर्यावरणाचे संवर्धन आणि नदी प्रदूषण टाळण्याचा संदेश देत संतोषनगर, थेरगाव येथील नवीन पुनावळे यांच्या कुटुंबीयांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी, रविवार (२० सप्टेंबर) रोजी घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

यावर्षी पुनावळे कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली होती. दररोज निर्माण होणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट घराच्या टेरेसवर उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पात लावण्यात आली. तर गणेशमूर्तीचे विसर्जन टेरेसवर ठेवलेल्या विसर्जन ड्रममध्ये करण्यात आले.

या उपक्रमाला घरातील ज्येष्ठ नागरिक, कुटुंबीय तसेच शेजारील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घरच्या घरी विसर्जन केल्यामुळे नदी अथवा जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास मदत झाली. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करता येतो, याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

उपस्थित नागरिकांनी पुढील वर्षी आपणही अशाच प्रकारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला. विशेष म्हणजे, कॉलनी तसेच आसपासच्या परिसरातील शाडू मातीच्या गणेशमूर्ती असलेल्या नागरिकांसाठी पुनावळे कुटुंबीयांनी त्यांच्या टेरेसवरील विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही सुरू केला आहे.

विसर्जनानंतर गणेशमूर्तीची माती पूर्णपणे विघटित झाल्यानंतर तिचा उपयोग टेरेसवरील फळझाडे आणि फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच गांडूळ खत प्रकल्पातून तयार होणाऱ्या खताचा वापर घरच्या टेरेस गार्डनसाठी केला जाणार आहे.

“पर्यावरणाचे रक्षण करत भक्ती आणि परंपरा जपता येते, याचा संदेश या उपक्रमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे पुनावळे कुटुंबीयांनी सांगितले.

See also  एक्झर्बिया अबोड, जांभूळ सोसायटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी