पुणे : कोथरूड येथील केळेवाडी परिसरातील श्री जयराम सहकारी गृह रचना संस्था, हनुमान नगर, मामासाहेब मोहोळ व्यायाम विकास मंडळ, राजीव गांधी पार्क आणि वसंतनगर परिसराचा जुन्या SRA पद्धतीऐवजी नियोजनबद्ध क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी संघटना आणि नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या SRA प्रकल्पातील त्रुटी, बिल्डरच्या कामकाजासंदर्भातील प्रश्न, SRA नियमावलीचे पालन, तसेच घरांच्या सर्वेक्षणात झालेल्या कथित चुका याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडण्यात आली. पात्र-अपात्र यादीतील त्रुटी दूर करून सर्व घरांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
केळेवाडी परिसरात SRA पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारती आणि तेथे वास्तव्यास गेलेल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी क्लस्टर पुनर्विकास हा अधिक योग्य पर्याय असल्याचे रहिवाशांनी सांगितले. जुन्या पद्धतीने SRA प्रकल्प राबविण्याऐवजी एकात्मिक नियोजनातून क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास केल्यास नागरिकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार निवास मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुनर्विकास करताना केवळ इमारती उभारण्यापुरता विचार न करता रस्ते, पार्किंग, उद्याने, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि अन्य मूलभूत सोयीसुविधांचा समावेश असलेला सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाचा प्रकल्प राबविल्यास स्थानिक नागरिकांचा पाठिंबा आणि सहमती राहील, असे रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना मांडत या मागणीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
‘रहिवाशांचे हित आणि सुरक्षित निवास यांना प्राधान्य देऊन केळेवाडी परिसराचा नियोजनबद्ध क्लस्टर पुनर्विकास करण्यात यावा,’ अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
















