प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर :जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकासाला प्राधान्य



पुणे : सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतून ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुरातत्व विभागातर्फे एप्रिलअखेर या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याचा विकास आराखड्याचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिंहगड किल्ल्याचा विकास करण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी जिल्हातील प्राचीन मंदीरे, गड व किल्ले यांचा २०२३-२४ च्या जिल्हा विकास आराखड्यात प्राधान्याने समावेश करुन त्यांचे जतन व संवर्धन तसेच त्या ठिकाणी भाविक व पर्यटकांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासीत केले होते.

सिंहगड किल्ल्याचा संवर्धनाचा विषय महत्वाचा असल्याने २०२२-२३ मध्ये त्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनदेखील पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा निधी मजूर झालेला आहे.

*जिल्हा वार्षिक योजनेतून ३० कोटींची तरतूद*
जिल्हा वार्षीक योजनेमधुन यावर्षी ३० कोटी रुपये जिल्ह्यातील गड व किल्ले संवर्धनासाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा विकास आराखडा बनविण्याच्या सुचना पालकमंत्री पाटील यांनी राज्य पुरातत्व विभाग़ाच्या सहायक संचालकांना दिल्या आहेत. येत्या जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत या सर्व कामांना मंजुरी देवून ही कामे पुढील वर्षी मार्च अखेरीस पुर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास:-
जिल्ह्यातील प्राचीन वास्तू व गड किल्ला संवर्धनास, ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांच्या विकासास २०२३-२४ मध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या कामांकडे लक्ष दिले असून त्याचा आढावादेखील सातत्याने घेण्यात येत आहे.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापुर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) ता. शिरूर येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली. दोन्ही कामे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात करण्यात येत आहे. मौजे सदुंबरे ता. मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देवून शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारीत करुन शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील क्रांतिकारकांचे असिम त्यागाचे स्थान सर्वांना प्रेरणा व स्फुर्ती देणारे असावे आणि ते राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा केंद्र व्हावे यासाठी किमान २०० कोटींचा आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली आहे.

डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तु व प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील याकडे लक्ष दिले जाईल. गड व किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करुन ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

See also  पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघांच्या 465 फेऱ्या, कशी असणार मतमोजणी? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या? वाचा..