कुणाल अस्पायरी सोसायटीत गणेशोत्सव उत्साहात

बालेवाडी : बालेवाडी येथील कुणाल अस्पायरी सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या ढोल पथकाच्या गजरात प्रसन्न वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सात दिवसांच्या गणेशोत्सवात सोसायटीच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण, म्युझिकल नाईट, लहान मुलांसाठी विविध गेम्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक खेळ, अंताक्षरी आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

गणेशोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात शनिवारी सोसायटीतील रहिवाशांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कुणाल अस्पायरी सोसायटीच्या गणेशोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे सोसायटीचे ढोल पथक. दरवर्षी ढोल पथकाकडून करण्यात येणारे नवनवीन सादरीकरण विशेष दाद मिळवून जाते. यंदाही ढोल पथकाच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांमध्ये एकोपा, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. याबाबतची माहिती सोसायटी सदस्या सौ. शुभांगी सावंत यांनी दिली.

See also  प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित