पुणे : गौरी-गणपती उत्सवानिमित्त दर्शन पार्क, डीपी रोड, औंध-बाणेर येथील सौ. वंदना चंद्रकांत कणसे यांच्या घरी यंदा ‘शेतकरी राजा’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक हलता देखावा साकारण्यात आला आहे.
या देखाव्यामध्ये शेतकऱ्याचे दैनंदिन जीवन आणि शेतीशी निगडित विविध कामांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. शेतजमिनीची मशागत, पेरणी, पिकांची निगा राखणे, कापणी तसेच शेतातील विविध कामे हलत्या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत.
शेतकरी दिवसभर कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन घेतो. त्याच्या मेहनतीमुळे समाजाला अन्न मिळते, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. ग्रामीण जीवनशैली, शेतीची कामे आणि शेतकऱ्याच्या कष्टांचे वास्तवदर्शी चित्रण पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व गणेशभक्तांची उत्सुकता वाढली.
‘शेतकरी राजा’ या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या श्रमाला सलाम करण्याचा तसेच नव्या पिढीला शेती आणि शेतकऱ्याच्या जीवनाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
















