बालेवाडीत १८ मीटर DP रस्त्याला सुरुवात; श्रेयासाठी भाजपा-राष्ट्रवादीत सोशल मीडिया वॉर! अमोल बालवडकरांकडून सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाचे श्रेय; लहू बालवडकरांकडून चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांचा दावा

पुणे | बालेवाडी : कुणाल एस्पायरी सोसायटी ते एफ रेसिडेन्सीला जोडणाऱ्या ‘मुख्य चौक व १८ मीटर DP’ रस्त्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाहणीनंतर आज सकाळपासून काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू होताच त्याच्या श्रेयावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या रस्त्याचे काम पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित जागामालकांशी समन्वय साधून आपल्या प्रयत्नातून सुरू झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते लहू बालवडकर यांनी कॅबिनेट मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याचे काम सुरू झाल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूंकडून रस्त्याच्या पाहणीचे आणि काम सुरू होण्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहेत.

नागरिकांना मात्र रस्ता सुरू झाल्याचा आनंद
कुणाल एस्पायरी, एफ रेसिडेन्सी, साई ईशान्या, पार्कलँड, ५१ बालेवाडी आणि आदित्य ब्रीझ पार्क या परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बालेवाडी-वाकड पुलाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले आहे. हा मार्ग लवकरच नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकाच विकासकामासाठी दोन वेगवेगळ्या राजकीय नेतृत्वांच्या नावांचा उल्लेख होत असल्याने ‘नेमके श्रेय कोणाचे?’ हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या श्रेयवादापेक्षा प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाल्याचे स्वागत नागरिकांकडून केले जात आहे.

रस्ता कोणाच्या प्रयत्नातून सुरू झाला, याचा अंतिम निर्णय राजकीय दाव्यांपेक्षा संबंधित महापालिका प्रशासनाच्या अधिकृत नोंदी आणि कामाच्या प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.

See also  चारशे पारची घोषणा संविधान उद्वस्थ करण्यासाठीच -डॉ. भालचंद्र मुणगेकर